कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप ताकदीने महापालिका निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार जिल्हा प्रभारी, माजी खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) भाजप जिल्हा प्रभारी, माजी खासदार अमर साबळे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. भाजपा जिल्हा कार्यालयात प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना महापालिकेत पक्षाची सत्ता आणण्यासाठी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी भाजपा कोल्हापूरच्यावतीने सुरु असलेल्या निवडणूक कार्याचा आढवा घेतला. तर भाजपा पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते, माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे कोल्हापुरात झाली आहेत. वैद्यकीय मदत, शहर सुशोभीकरण अशा अनेक गोष्टींमध्ये चांगले कार्य झाले असल्याचे नमूद केले. महापालिकेमध्ये सत्ता असणाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी कोणतेही भरीव कार्य केले नसल्याची टीका केली.

प. म. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने थेट पाईपलाईन, ड्रेनेज व्यवस्था, घरफाळा घोटाळा अशा अनेक विषयांमुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळत नसल्याचे नमूद केले.

या बैठकीला सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, माजी गटनेते अजित ठाणेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, संतोष भिवटे, अमोल पालोजी, सचिन तोडकर, किशोरी स्वामी, जिल्हा चिटणीस प्रमोदिनी हर्डीकर, दीपक काटकर, प्रदीप उलपे, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत, विजयसिंह खाडे-पाटील, डॉ.राजवर्धन, विवेक कुलकर्णी  आदी उपस्थित होते.