कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखान्याचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांनी आज (रविवार) आपल्या निवडक कार्यकर्त्यासह पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.

दौलत साखर कारखान्याचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांचा एक मोठा गट चंदगड विधानसभा मतदार संघात कार्यरत आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत थोड्याच मताने गोपाळरावांचा पराभव झाला. या पराभवानंतर कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण झाले. त्यानंतर केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण माजी मंत्री चंद्रकांतदादा यांनी त्यांना दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे गोपाळराव गटाचा मोठा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये नाराजी निर्माण झाली. या गटात असणारी तरुण कार्यकर्त्यांची फळी मात्र पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी इच्छुक होती. त्यामुळे चंदगड तालुक्यात विकासकामे करण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद मिळावी, म्हणून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय मेळावा घेऊन पाटील यांनी घेतला.

मात्र, कोरोनामुळे पक्ष प्रवेश लांबणीवर गेला. पालकमंत्री सतेज पाटील हे दीर्घकाळ देशाबाहेर असल्यामुळे तसेच भारतात आल्यानंतर त्यांना कोरोना झाल्यामुळे हा प्रवेश जवळपास एक महिना पुढे ढकलला. यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यामध्ये उलटसुलट चर्चा चालू होती. या चर्चेला गोपाळरावांच्या आजच्या कॉंग्रेसमधील प्रवेशामुळे पूर्णविराम मिळाला आहे.गोपाळराव पाटील गटाच्या काँग्रेसमधील प्रवेशामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. गोकुळ, केडीसी बँक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेस पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे, असे दिसून येते.

चंदगड तालुक्यात पक्षापेक्षा गटाला जास्त महत्व आहे. तालुक्यात गोपाळराव पाटील, भरमूअण्णा पाटील आणि आमदार राजेश पाटील यांचे वेगवेगळे गट कार्यरत आहेत. गोपाळरावांच्या काँग्रेस प्रवेशामुळे तालुक्यात खूप मोठी टाकद वाढणार आहे. गोपाळराव यांच्याबरोबर जि.प. सदस्य कल्लापा भोगण आणि जि. प. सदस्य सुजाता पाटील यांचे पती विलास पाटील यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा युवा अध्यक्ष विद्याधर गुरबे, चंदगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी देसाई, गुलाबराव घोरपडे, समन्वयक जे. के. पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी, संदीप नांदवडेकर, गोविंद पाटील, संजय पाटील, अंकुश गावडे, अंकुश गवस, अशोक जाधव, उत्तम पाटील, अनंत कांबळे, निंगाप्पा आवडण यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.