पणजी (वृत्तसंस्था) : गोहत्याबंदीवरून नेहमी भाजप आक्रमक भूमिका घेत असतो. मात्र, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री आता चक्क नागरिकांना पुरेसे ‘बीफ’ मिळावे यासाठी धावपळ करीत आहेत. कर्नाटक सरकारने दोनच आठवड्यांपूर्वी गोमातेबरोबरच म्हशी आणि रेड्याना संरक्षण देणारे विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे गोवा राज्यामध्ये बीफचा तुटवडा जाणवू लागल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत आता इतर राज्यांकडून ‘बीफ’चा पुरवठा सुरळीत होईल, यासाठी प्रयत्न करीत आहेत.

गोमांस बंदीसंदर्भातील सावंत म्हणाले की, मी सुद्धा गोमातेची पूजा करतो. मात्र आमच्या राज्यामध्ये ३० टक्के जनता ही अल्पसंख्याक आहे. त्यामुळे त्यांच्या आहारातील प्रमुख घटक असणाऱ्या गोमांसाचा सुरळीत पुरवठा होत राहील आणि राज्यात गोमांसाचा तुटवडा जाणवणार नाही यासंदर्भातील संपूर्ण काळजी घेतली जाईल. कर्नाटकने गोमांसावर बंदी घातल्याने अडचण निर्माण झालीय. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक हा गोव्यामध्ये मांस पुरवठा करणारं प्रमुख राज्य आहे. मी पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा संचालकांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. या समस्येबद्दल काय करता येईल याबद्दल मी माहिती मागवली आहे, असंही सावंत यांनी म्हटलं आहे.