कोलकाता (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीआधीच राज्यात आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. जर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाली नाही तर, ते गुप्तरित्या लोकांना पाठवून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांच्या हत्येचा कट रचू शकतात,  असा गंभीर आरोप पंचायत आणि ग्रामीण विकासमंत्री सुब्रत मुखर्जी यांनी भाजपवर केला आहे. पश्चिम बंगालमध्ये आयोजित एका सभेत ते बोलत होते.  

सुब्रत मुखर्जी  पुढे म्हणाले की, जर ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढून भाजप जिंकली नाहीतर,  ते आपल्या लोकांना पाठवून ममता बॅनर्जी यांच्या हत्येचा कटही रचू शकतात.  दरम्यान, त्यांच्या या विधानावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर डायमंड हार्बरकडे जाताना दगडफेक झाली होती.  यात भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्याह अन्य नेते जखमी झाले होते. यावरून  हा हल्ला टीएमसीच्या गुंडांनीच केला असल्याचा दावा  भाजपने केला होता. आता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांने भाजपवर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.