कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या पालकांच्या समोर शैक्षणिक फी भरण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसुली केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक यांना निवेदन दिले. 

या निवेदनात, सध्याच्या या आर्थिक संकटामध्ये चालू शैक्षणिक वर्षाची फी ५०% शासनाने भरावी व उर्वरित ५०% फी माफ करावी त्याचबरोबर विनाअनुदानीत शाळांचे मागील ५ वर्षापासूनचे ऑडीट करावे त्याचबरोबर फी वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या या शाळा व्यवस्थापनावर फौजदारी करून शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आली. भाजपा पदाधिकाऱ्यांनी चाललेल्या गलथान कारभारावर निषेध व्यक्त करून शिक्षण उपसंचालक यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले,  सध्या शाळांनी विद्यार्थ्यांचे वर्गनिहाय व्हाटसअॅप् ग्रुप केले असून या ग्रुपवर फी न भरलेले,  कमी फी भरलेले अशा पालकांची यादी जाणीवपूर्वक प्रसिद्ध केली जात आहे. या सर्वाचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होताना दिसत आहे. अशा पद्धतीची सुरु असणारी फी वसुली लाजीरवाणी आणि अपमानास्पद आहे. विद्यार्थी आणि पालक यांच्या बदनामीला जबाबदार कोण ?  असा सवाल केला. आपल्याकडे तक्रारी दाखल होत असताना देखील आपण अशा शाळांवर कठोर कारवाई का करत नाही यासाठी सोनवणे यांना चांगलेच धारेवर धरले.

दरम्यान, शिक्षण उपसंचालकांनी भविष्यात अशा तक्रारी पुन्हा उपस्थित होणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबत संबंधीत क्षेत्रीय अधिका-यांना सूचना दिल्या. क्षेत्रीय अधिकारी म्हणून आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांची चौकशी करून १० दिवसांत याबाबतचा अहवाल सादर करावा असे लेखी आदेश दिले आहेत.

यावेळी सरचिटणीस हेमंत आराध्ये, गणेश देसाई जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, अक्षय निरोखेकर आदी उपस्थित होते.