पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आहेत. त्यांच्याहस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झालं. हा कार्यक्रम सुरु असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत पहाटे घेतलेला शपथविधी गाजलेला होता. त्यानंतर दोन्ही नेते पुणे प्रथमच पुणे महापालिकेतील सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले. भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या लोकापर्णानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. हा कार्यक्रम सुरु असताना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली गेली. भाजपकडून जय श्री रामची घोषणा देण्यात येत होती. त्यानंतर राष्ट्रवादीने चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामनेही भिडले.