कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील स्थानिक नाट्यकर्मी आणि नाट्यसंस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमासाठी ३१ मार्चपर्यंत केशवराव भोसले नाट्यगृहातील भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. सांस्कृतिक वसा जपण्यासाठी या पुढील काळात स्थानिक नाट्यकर्मींना कायमस्वरूपी कमी दरात केशवराव नाट्यगृह उपलब्ध होण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

केशवराव भोसले नाट्यगृहात स्थानिक नाट्यसंस्थांसह नाट्यकर्मींना कार्यक्रमासाठी भाड्यामध्ये सवलत मिळावी या प्रमुख मागणीसह अन्य विविध सुविधांबाबत आज (सोमवार) केशवराव भोसले नाट्यगृहात महापालिका प्रशासन आणि स्थानिक नाट्यसंस्थांचे पदाधिकारी,  नाट्यकर्मी यांची बैठक पार पडली. यावेळी नाट्यगृहातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तर नाट्यगृहात ग्रीन रुम, पाण्याची व्यवस्था, एसी १०० टक्के सुरू राहणे,  साऊंड इंजिनिअर यासह बेसिक सुविधा अद्यावत करण्याची भूमिका घेण्यात आली.

या बैठकीला प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे,  उपायुक्त निखिल मोरे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई,  माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी महापौर सौ. निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, शहर अभियंता सरनोबत यांच्यासह स्थानिक नाट्यसंस्थांचे पदाधिकारी, महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.