मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या कुस्ती चळवळीचा आधारस्तंभ, उदयोन्मुख कुस्तीपटूंचे मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

श्रीपती खंचनाळे बेळगावच्या एकसंबा गावातून कोल्हापूरात आले आणि कोल्हापूरचेच होऊन गेले. १९५९ ला दिल्लीत झालेल्या कुस्तीत त्यांनी त्यावेळचा दिग्गज पहेलवान रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंगला हरवून हिंदकेसरी झाले. वडिलांकडून आलेला कुस्तीचा वारसा त्यांनी पुढच्या पिढीपर्यंत, राज्यातील अनेक नवोदय पहेलवानांपर्यंत पोहोचवला. राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी भरीव काम केले. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्रातील कुस्ती चळवळीला व कुस्तीपटूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देणे, हीच खंचनाळे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.