कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंडियन मेडिकल असोसिएशन (आय. एम. ए.), नाशिकतर्फे दरवर्षी ‘आविष्कार’ या राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा हा कार्यक्रम प्रथमच आय. एम. ए. च्या कोल्हापूर शाखेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉक्टरांनी आपल्यातील विविध कलागुणांचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण फेसबुकवरून करण्यात आले. देशविदेशातील अनेकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एम. शिर्के, मानद सचिव डॉ. गीता पिल्लाई,  खजानीस डॉ. शितल देसाई,  को–ओर्डीनेटर डॉ. पी. एम्. चौगले, आर्ट्स सर्कलचे सदस्य डॉ. अमर अडके, डॉ. सोपान चौगुले, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. राजेंद्र वायचळ आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये उन्नती सबनीस, अजित कुलकर्णी, मनीषी नागावकर, सौ. रूपा नागावकर, डॉ. शरद भुताडिया, अरुण धुमाळे, अनिता परितेकर, अरुण देशमुख, संजय घोटणे, राजेंद्र वायचळ, पी. एम. चौगुले या डॉक्टरांनी सहभाग घेतला होता.

डॉ. सोपान चौगुले यांनी नकलांचा कार्यक्रम सादर केला. ‘महाराष्ट्राची लोकधारा या विषयास अनुसरून डॉ. आशा जाधव, रुपाली दळवी, प्रिया शहा, गायत्री होशिंग, महेश दळवी, मीनाक्षी काळे, प्रीती चिंचणीकर या सभासदांनी बहारदार नृत्य कार्यक्रम सादर केला. ज्येष्ठ सभासद, अभिनेते डॉ. शरद भुताडिया यांनी अप्रतिमरित्या नाट्यछटा सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. डॉ. अमर अडके आणि डॉ. मंजिरी वायचळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर डॉ. गीता पिल्लाई यांनी आभार मानले.