टोप (प्रतिनिधी) : स्मॅक व एमएसएमई यांच्या माध्यमातून उद्योजकांसाठी व्यवसायाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, जेणेकरून आपल्या कंपनीच्या व आपल्या स्वतःच्या कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ. आपल्या सर्वांना मिळून एक चांगली एमआयडीसी घडवायची आहे, असे प्रतिपादन शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे (स्मॅक) अध्यक्ष अतुल पाटील यांनी केले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि ‘स्मॅक’तर्फे रामप्रताप झंवर हॉल, स्मॅक भवन येथे आयोजित पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.  

‘सिक्स सिग्माकडे वाटचाल आणि समस्येचे निराकरण करण्याचे तंत्र’ हा या प्रशिक्षण वर्गाचा विषय होता. समारोपप्रसंगी एमएसएमई,  टीडीसी पीपीडीसी, आग्राचे सहाय्यक संचालक विकास वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी व्याख्याते अभिजित कोपर्डे म्हणाले की, या सिक्स सिग्मा प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण समस्या सोडविण्यासाठी चांगले तंत्र शिकलो आहोत आणि समस्या सोडवण्यास सक्षम आहोत, हे आपले सर्वांत मोठे यश आहे.

विकास वर्मा म्हणाले की, प्रशिक्षणार्थी ज्या वेळी आपापल्या कंपनीत जातील त्या वेळी प्रशिक्षणादरम्यान शिकलेल्या ज्ञानाचा त्यांना नक्कीच फायदा होईल. एमएसएमई टीडीसी, पीपीडीसी आग्राचे फिल्ड ऑफिसर प्रतीक पराशर म्हणाले की, आपली कंपनी सर्वोत्तम होण्यासाठी व आपल्या कंपनीमध्ये सुधारणा होण्यासाठी आपल्या मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे आहे.

प्रशिक्षणार्थींनी आपली प्रेझेंटेशन्स सादर केली. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. सेमिनार कमिटी अध्यक्ष अमर जाधव, निमंत्रित संचालक शेखर कुसाळे, जिल्हा समन्वयक विजय पवार,  प्रशिक्षणार्थी, उद्योजक आदी उपस्थित होते.