जालना (प्रतिनिधी) :  राज्यात लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून लसीकरणाचा पहिला प्रयोग मुंबईतील केईएम रुग्णालयात केला जाणार आहे. आता केंद्र सरकार आणि औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहत आहोत, अशी महत्त्वपूर्ण माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.

राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे, आता फक्त केंद्राच्या परवानगीकडे लक्ष आहे.  लस संपूर्ण राज्यभरात पोहोचवण्यासाठी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. वाहतूक आणि कोल्ड चेनची व्यवस्था करण्यासाठी अत्यंत जलद गतीने महाराष्ट्रात काम सुरु आहे. सिरमचे  अदर पूनावाला यांनीदेखील महाराष्ट्रात कोल्ड चेन, प्रशिक्षण आणि वाहतुकीबद्दल जे टार्गेट दिले होते. ते आम्ही पूर्ण केले  आहे.

दरम्यान, राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. लॉकडाउनच्या काळात अनेक महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था बंद होत्या. त्यामुळे रक्तदान शिबिरे होऊ शकली नाही. त्यामुळे आता तरुणांनी रक्तदान करावे, असे आवाहन टोपे यांनी यावेळी केले.