इचलकरंजी (प्रतिनिधी) : घरगुती वीज जोडणी कनेक्शन मंजूर करण्यासाठी सात हजारांची लाच स्विकारताना इचलकरंजीत महावितरणचा सहाय्यक अभियंता सुनील चव्हाण (रा. सांगली) याला कोल्हापूर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली. या कारवाईमुळे शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाजाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इचलकरंजी येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात सहाय्यक अभियंता सुनिल चव्हाण हे कार्यरत आहेत. त्यांनी घरगुती वीज जोडणी कनेक्शन मंजूर करण्याच्या कामासाठी सरकारी वीज जोडणी ठेकेदार यांच्याकडे सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तडजोडीअंती त्यांनी सहा हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. या प्रकाराची माहिती माळी यांनी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयाला दिली होती.

त्यानुसार लाचलुचपत विभागाने पथकाने सापळा रचून ठेकेदाराकडून सहा हजार रुपये स्विकारताना सहाय्यक अभियंता सुनील चव्हाण यांना रंगेहाथ पकडून अटक केली. तसेच त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधिन केले. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.