कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या परिसरात कोरोनाच्या काळातही बिअर बार रात्री १० पर्यंत खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे.

परवा कळेतील एका बिअर बारवर पोलिसांनी छापा टाकला आणि मालकावर कारवाई केली. तरीही खुलेआम सुरू असलेल्या इतर धनदांडग्या बिअर बार मालकांना मात्र यातून सूट दिल्याचे दिसून येत आहे. राजकीय वरदहस्त आणि पोलिसांना वेळेवर मिळणारा हप्ता, यामुळे कदाचित इतर बिअर बारना सूट दिली जात असल्याचे परिसरातील नागरिकांतून बोलले जात आहे. परंतु काही बिअर बार मालकांना मात्र टारगेट केले जात आहे.

आतापर्यंत कळेत १९१ कोरोनाचे रुग्ण सापडले असून त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसेंदिवस मुख्य बाजारपेठेमुळे येथील संख्या वाढतच असून काही बिअर बारमध्ये तर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तसाच प्रकार ग्रामीण भागातील बिअर बार मध्येही दिसून येत आहे. त्यामुळे परवा केलेली कारवाई ही फक्त लोकांना दाखवण्यापूर्ती केली होती का ? आणि जिल्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष का आहे ? असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.