बुलढाणा (प्रतिनिधी) : यंदाच २०२० हे वर्ष सर्वांसाठीच त्रासदायक ठरले आहे. या वर्षात अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे. यातच देशाच्या सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना भारताच्या अनेक सुपुत्रांना वीरमरण प्राप्त झाले आहे. भारतीय सैन्य दलात महार रेजिमेंटचे पराक्रमी जवान प्रदीप मांदळे हे कर्तव्यावर असताना शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील द्रास टायगर हिल भागात ते आपले कर्तव्य बजावत होते.

तेथे मंगळवारी (१५ डिसेंबर) मध्यरात्री त्यांना वीरमरण आले. प्रदीप हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. त्यांचे मूळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड (ता.सिंदखेडराजा) आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर प्रदीप हेच घरातील कर्त्या पुरुषाची भूमिका निभावत होते. त्यांच्या निधनाने केवळ मांदळे कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. प्रदीप २००८-०९ मध्ये लष्करात भरती होऊन महार रेजिमेंटमध्ये दाखल झाले. प्रदीप यांच्या पश्चात पत्नी कांचन, आणि तीन मुले असा परिवार आहे.