पुणे (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोव्हेंबर २०१९मध्ये पहाटे शपथविधी केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. परंतु महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. आता पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर हे दोघे नेते पुन्हा एकत्र येणार असल्याने ते काय बोलतात ?, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

पुणे शहराला अधिकचा आणि सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प’ सुरू केला आहे. याचा १ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. महापालिकेच्या नवीन इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी चार वाजता हा सोहळा होणार आहे.  या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण, वने व माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  खासदार गिरीश बापट आदी उपस्थित राहणार आहेत. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ  हिवाळी अधिवशेनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.