नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना प्रतिबंधक लसींना मान्यता मिळाल्याने कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीच्या छायेत वर्षभर जगत असलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी कोरोनाच्या लसीच्या किमतीबाबत माहिती देताना सांगितले की, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका यांनी तयार केलेल्या कोविशिल्ड या लसीचे उत्पादन सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असलेली ऑक्सफर्डची कोरोनावरील लस सरकारला २०० रुपयांमध्ये दिली जाईल. तर सर्वसामान्य जनतेलाही लस एक हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल.

‘डीसीजीआय’चे संचालक व्ही. जी. सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर अदर पूनावाला यांनी ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला. नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. लस संकलनासाठी सीरम इन्स्टिट्यूटने पत्करलेल्या सर्व जोखीमानंतर अखेर यश मिळाले. कोरोनावर मात करणारी कोविशिल्ड ही पहिली लस असून तिच्या वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असून पुढील आठवड्यापासून ती देण्यास तयार आहे, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.