कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसापासून वीज बिल भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांवर सक्ती करण्यात येत आहे. याशिवाय काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांची भेट घेतली. विज बिलासाठी सक्ती करू नका अशी मागणी केली. लॉकडाउन काळातील वीज बिले भरमसाठ आली आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही बिले भरणार नाहीत. जर त्यासाठी सक्ती कराल तर संघर्ष हा अटळ असेल असा इशाराही निवासराव साळोखे यांनी दिला.

अॅड. बाबा इंदूलकर यांनी वीज बिलांची सक्ती करणार नाही याबद्दल महावितरणने लेखी हमी देण्याची मागणी केली. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाकडे जवळपास लाखो रुपयांची वीजबिलांची थकबाकी आहे. त्यामुळे प्रथम शासकीय कार्यालयांच्या बिलांची वसुली करा मगच सर्वसामान्य नागरिकांच्या मागे तगादा लावा अशी भूमिकाही यावेळी मांडण्यात आली. ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी सर्वसामान्य नागरिकांचा वीजपुरवठा खंडित केल्यास, प्रसंगी महावितरणच्या कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन काळातील वीजबिले भरावी लागणार असल्याचं वक्तव्य केल्याने त्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. या शिष्टमंडळामध्ये बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रांत पाटील- किणीकर, माजी नगरसेवक बाबा पार्टे, अशोक भंडारे, जयकुमार शिंदे, आर. के. पाटील, चंद्रकांत पाटील, मारुती पाटील, अॅड. सतीश नलवडे आदी सहभागी होते.