बेळगाव (प्रतिनिधी) : कर्नाटकातील प्रसिद्ध गोकाकच्या धबधब्यावर काचेच्या ब्रीजची निर्मिती करण्यात येणार आहे. धबधब्यापासून केवळ २० मीटर अंतरावर अमेरिकेतील धबधब्याच्या धर्तीवर काचेच्या ब्रीजची निर्मिती करण्याची योजना आखण्यात आली आहे.

हिडकल डॅम, गोकाक धबधबा आणि गोडचिनमलकी धबधबा ही तिन्ही पर्यटन स्थळे एकमेकांपासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर आहेत. या तिन्ही पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्याची योजना जलसंपदा आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आखली आहे. या विकास कामांतर्गत गोकाकच्या धबधब्याजवळ २० मीटर अंतरावर अमेरिकेच्या पॅटर्नवर आधारित काचेच्या ब्रिजची निर्मिती करण्यात येणार आहे. सुमारे ३५० कोटी रुपयांच्या खर्चातून या क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे. या कामकाजाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.