नाशिक  (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघू लागले आहे. कोठे चुरस, ईर्षा, तर कोठे बिनविरोध असे चित्र असताना नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे गावात सरपंचपदासाठी तब्बल २ कोटींची बोली लावण्यात आली.  

कांद्याची मोठी बाजारपेठ  असलेल्या या गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. त्यासाठी गावकऱ्यांनी  बोलवलेल्या सभेत सरपंचपदासाठी जाहीरपणे लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला.  यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास  देवरे यांचे सुपुत्र आणि माजी सरपंच प्रशांत उर्फ चंदू देवरे यांच्या पॅनलने या लिलावासाठी तब्बल २ कोटी ५ लाखांची बोली लावली. सुनील दत्तू देवरे यांनी लावलेली बोली अंतिम ठरली. या लिलावानंतर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार असण्याचे जाहीर करण्यात आले. बोलीच्या रक्कमेतून उमरणे गावाचे  ग्रामदैवत रामेश्वर मंदिराचा जीर्णोधार करण्यात येणार आहे.