रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला ‘लाईव्ह मराठी’चा ‘तुझी माझी जोडी’ कार्यक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरचा अभिमान असलेला रंकाळा तलाव…त्या परिसरातील रमणीय पदपथ उद्यान…संधिकालाच्या सावल्या अधिकच दाटू लागल्या…‘सूर निरागस हो’ गीताचे बोल महेश हिरेमठ आणि सहकाऱ्यांच्या सुरेल कंठातून उमटले आणि पदपथ उद्यानात जमलेल्या शेकडो रसिकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांनी या कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली. निमित्त होते कोल्हापुरात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या ‘लाईव्ह मराठी’ या न्यूज पोर्टल आणि इन्फोटेनमेंट चॅनेलतर्फे आयोजित ‘तुझी माझी जोडी’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे.

महिला दिनानिमित्त रविवारी (दि. ११) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ‘लाईव्ह मराठी’तर्फे ‘तुझी माझी जोडी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायक महेश हिरेमठ यांच्या अंतरंग संस्थेतर्फे रोमँटिक गीते आणि उपस्थितांसाठी स्पॉट गेम असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. प्रारंभी इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके, बेस्ट ऑफ प्लेस शोरूमचे अभिजित सरदेसाई, सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई, ‘लाईव्ह मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक प्रमोद मोरे, कार्यकारी संपादक सुरेश पाटील यांच्या हस्ते गुलाबाच्या रोपास पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रमोद मोरे यांनी प्रास्ताविक केले. अरुण नरके, अभिजित सरदेसाई, सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई यांनीही मनोगत व्यक्त केले.

यानंतर महेश हिरेमठ, शुभांगी जोशी, यशपाल देवकुळे यांनी ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात, सूर तेच छेडिता, प्रीतीचे झुळझुळ पाणी, पाहिले न मी तुला, चोरीचा मामला मामाही थांबला, प्रीतीच्या चांदराती, गुलाबी आँखे जो तेरी देखी, छुप गये सारे नजारे’ या एकापेक्षा एक सरस मराठी, हिंदी गाण्यांचा सुरेल नजराणा पेश केला. काही गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत ‘वन्स मोअर’ची शिफारसही केली. जमलेल्या रसिकांसाठी काही गाणी झाल्यानंतर स्पॉट गेम झाले. त्यातील विजेत्यांना आदर्श भीमा वस्त्रम, विप्रास टेक्नो मार्ट यांच्यातर्फे विशेष गिफ्ट कुपन देण्यात आले. यानंतर जसजशी उपस्थितांची गर्दी वाढत गेली तसतसा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. श्रोत्यांमधील सौ. प्रीती सतीश देसाई यांनी ‘टायटॅनिक’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील  ‘My heart will go on’  हे थीम सॉंग गाऊन रसिकांची वाहवा मिळविली.

परिवहन सभापती राहुल चव्हाण, सौ. स्नेहल चव्हाण, आदर्श भीमा वस्त्रमचे तुलसी असवानी यांनी कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शविली. त्यांच्यासह अरुण नरके, सुरेश पाटील, प्रमोद मोरे, सौ. शुभांगी मोरे, लाईव्ह मराठीचे चीफ ऑपरेशन्स ऑफिसर अजित तांबेकर, वरिष्ठ उपसंपादक विवेक जोशी यांच्या हस्ते स्पॉट गेममधील विजेत्यांना विशेष गिफ्ट कुपन प्रदान करण्यात आले. विजेत्यांमध्ये जयंती मोहिते-पाटील, अश्विनी बकरे, दीपक पाटील, लता पोतदार, राकेश निल्ले, सौ. काजल हावळ, प्रकाश संताने, सौ. व श्री. विनोद देशपांडे, सौ. व श्री. चंद्रकांत उंडाळे, सौ. व श्री. रामचंद्र वर्णे, चि. अद्वैत रेडेकर यांचा समावेश होता. 

क्या खूब लगती हो, तू ही रे, मै तेनु समझावा की, मेरे रशके कमर, मला म्हणत्यात लवंगी मिरची, अश्विनी ये ना, हृदयी वसंत फुलताना, मला वेड लागले प्रेमाचे, झिंगाट या गाण्यांनी कार्यक्रमाचा उत्तरार्ध रंगला. प्रकाश साळोखे यांनी सॅक्सोफोनवर ‘तिसरी मंझील’मधील ‘आजा आजा मै हूँ प्यार तेरा’ हे गीत अप्रतिमरित्या पेश केले. ‘तुमसे मिलके’ या ‘परिंदा’मधील गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सौ. शुभदा हिरेमठ, निवृत्त प्रा. सतीश कुलकर्णी यांनी समयोचित सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची उंची वाढविली. महेश हिरेमठ यांना राजू आवटी (तबला, ढोलक), मनोज जोशी (ऑक्टोपॅड), सिंथेसायझर (सुनील गुरव), गणेश साळोखे (इलेक्ट्रिक गिटार), प्रकाश साळोखे (ट्रंपेट, क्लॅरोनेट) या वादक कलाकारांनी अप्रतिम साथ केली. या कार्यक्रमासाठी आदर्श भीमा वस्त्रम्, बेस्ट ऑफ प्लेस, विप्रास टेक्नो मार्ट, परफेक्ट किचन्स- ट्रॉलीज फर्निचर यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे