Breaking News

 

 

कर्नाटकातील राजकीय पेच सुटेना ! : विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

बेंगळूरू (वृत्तसंस्था) : कर्नाटकातील राजकीय पेचप्रसंगाची व्याप्ती अधिकच वाढत आहे. कुमारस्वामी सरकारने काल (गुरुवारी) विश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र कालपासून सलग दोन दिवस विधानसभेत चर्चाच सुरु आहे. राज्यपालांंनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन वेळा मुदत दिली, मात्र कुमारस्वामी सरकारने त्याला केराची टोपली दाखवली. आता सोमवारी ठरावावर मतदान होणार असून तोपर्यंत विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

कर्नाटकमधील राजकीय नाट्याचा काल शेवट होईल असे वाटत होते, मात्र अद्यापही विश्वास दर्शक ठरावावर मतदान घेण्यात आलेले नाही. विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार सत्ताधाऱ्यांना अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोप भाजपकडून तर भाजपच्या सांगण्यावरून राज्यपाल सरकारला अडचणीत आणत आहेत असा आरोप जेडीएस-कॉंग्रेसतर्फे होत आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभा अध्यक्षांना विनंती केली की, सोमवारी आम्ही कोणत्याही परिस्थितीत मतदानाला सामोरं जातो, पण आजच कामकाज संपवा. रमेशकुमार यांनी या विनंतीनुसार सोमवारपर्यंत विधानसभेचे कामकाज स्थगित केले आहे. आजच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या, असा राज्यपालांचा आदेश विधानसभा अध्यक्षांनी दुसऱ्यांदा धुडकावला आहे. आता सोमवारी सकाळी ११ वा. सभागृहाचे कामकाज सुरु होणार आहे.

561 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग