Breaking News

 

 

मी कुठे त्यांचं नाव घेतलंय ? : चंद्रकांतदादा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये येणार असे मी म्हटले होते, मात्र त्यावेळी मी विश्वजीत कदम यांचे नाव घेतलेले नाही असे स्पष्टीकरण भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज (शुक्रवार) दिले. तरीही काही आमदार मुख्यमंत्र्यांना ‘रात्री’ भेटतात, असा गौप्यस्फोटही त्यांनी या वेळी केला.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती मिळाल्यानंतर चंद्रकांत पाटील हे आज (शुक्रवार) प्रथमच कोल्हापुरात आले. त्यांचे जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी दसरा चौकात जल्लोषी स्वागत केले. राजर्षी छ. शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजप-शिवसेना युतीच राज्यात सत्तेवर येणार आहे. म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना आमच्या प्रवाहात येण्याचे आवाहन केले आहे. जे येतील त्यांना बरोबर घेऊन जे येणार नाहीत, त्यांच्याशी संघर्ष करुन राज्यात युतीची सत्ता आणणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार आणि नेत्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल मी फक्त टोप्या टाकल्या, त्यातील एक विश्वजीत कदम यांना बसली. मी त्यांचे नाव कुठे घेतले होते ? लोकसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे युतीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघ काम करुन यश मिळवले. त्याचप्रमाणे आगामी विधानसभेच्या निवडणूकीतही युतीच्या यशासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, आ. अमल महाडिक, विजय जाधव, बाबा देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

2,370 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग