Breaking News

 

 

नवमतदारच भाजप-शिवसेनेला धडा शिकवेल : आ. मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : महागाईमुळे राज्यातील गोरगरीब जनता पिचलेली आहे. त्यामुळे नवमतदारच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा – शिवसेनेला धडा शिकवतील. सरकारची मस्ती उतरविण्याची हीच योग्य वेळ आहे, अशी टीका आ. हसन मुश्रीफ यांनी केली. आज (शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाढत्या महागाईच्या विरोधात कागल शहरात मोर्चा काढण्यात आला. यानंतर मोर्चाला संबोधित करताना आ. मुश्रीफ यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.

मुश्रीफ म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती तुलनेने कमी होऊनही केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये कपात करायला तयार नाही. त्यामुळे वाढलेल्या महागाईने जनता त्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास सरकारकडे वेळ नाही. राज्यातील शेतकरी समाधानी होऊन तरुणांच्या आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळायचे असेल, महागाई कमी व्हायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे सरकार येणे हाच एकमेव पर्याय आहे. आगामी निवडणुकीत सरकारची मस्ती उतरविण्याची हीच योग्य वेळ आहे.  

या वेळी शहरातील पेट्रोल पंपांवर जाऊन आमदार मुश्रीफ यांच्यासह कार्यकर्त्यांनी गांधीगिरीचा अवलंब करीत गुलाबपुष्प देऊन पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला. या मोर्चात कागल तालुक्यातील आणि शहरातील पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

*गोरगरीब जनता आमच्यासोबत*

आ. मुश्रीफ म्हणाले की, कागल विधानसभा मतदारसंघात कोणी काहीही करो, कुणी कितीही खोटीनाटी स्टंटबाजी व नौटंकी करो, आम्हाला त्याचा फरक पडणार नाही. स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्यापासून तुळशीचं पान हे आमच्याच पदरात आहे. कारण, गोरगरीब जनता आमच्यासोबत आहे.

738 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग