Breaking News

 

 

श्रीदेवीचा खूनच झाला होता… : आयपीएस अधिकाऱ्याचा दावा

कोची (वृत्तसंस्था) : दुबईत २४ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेला अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हा अपघाती नसून तो खून होता, असा खळबळजनक दावा एका आयपीएस अधिकाऱ्याने केला आहे. ऋषिराज सिंह असं या आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे. आपल्या या दाव्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी त्यांच्या आपल्या मृत डॉक्टर मित्राचा हवाला दिला आहे.

एक वृत्तवाहिनीनुसार, सिंह हे केरळ येथे पोलीस महासंचालक (कारागृह) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचे दिवंगत मित्र आणि न्यायवैद्यक शल्यविशारद असलेल्या डॉ. उमादथन यांच्या हवाल्याने हा खळबळजनक दावा केला आहे. बुधवारी डॉ. उमादथन यांचं निधन झालं. त्यांना समर्पित करणारा लेख लिहिताना सिंह यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. उमादथन यांना श्रीदेवी यांच्या मृत्युविषयी सिंह यांनी विचारलं होतं. तेव्हा उमादथन यांनी श्रीदेवी यांचा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचं म्हटलं होतं.

एका फुटाच्या बाथटबमध्ये मद्यधुंद व्यक्ती बुडू शकत नाही. कुणीतरी जाणूनबुजून बुडवल्याशिवाय बुडणं शक्यच नाही. श्रीदेवी यांच्याबाबतीतही हेच घडलं होतं. त्या वेळी त्यांच्या खोलीत एका अन्य व्यक्तीने ज्याने श्रीदेवी यांचे पाय धरून ठेवले आणि मग त्यांचं डोकं पाण्यात बुडवण्यात आलं, अशी माहिती या लेखात सिंह यांनी दिली आहे. सिंह यांच्या दाव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

श्रीदेवी यांचा मृत्यू २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबई येथील त्यांच्या हॉटेलरूमच्या बाथटबमध्ये बुडून झाला होता. श्रीदेवी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब मोहित मारवाह या त्यांच्या नातलगाच्या लग्नासाठी दुबईत दाखल झालं होतं. श्रीदेवी यांच्या मृत्युनंतर त्यांचे पती बोनी कपूर यांची दुबई पोलिसांनी चौकशीही केली होती. त्यानंतर पोलिसांनी हा मृत्यू अपघाती असल्याचं जाहीर केलं होतं.

2,025 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग