Breaking News

 

 

भाजपाच्या थेट पाईपलाईन प्रश्नांवर महापालिका प्रशासन निरुत्तर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या सुरुवातीपासूनच प्रशासन सल्लागार कंपनी आणि ठेकेदाराच्या गलथानपणा, भोंगळ कारभार यामुळे ही योजना कायमच वादग्रस्त ठरली आहे. भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी त्रुटी दाखवून देऊनही प्रशासनाने लक्ष घातले नाही. ही योजना पूर्ण होणार की नाही, झालीच तर गुणवत्तापूर्ण होणार का, अशी विचारणा आज (बुधवार) भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केली. त्यावर प्रशासन निरुत्तर झाले.

जिल्हाध्यक्ष चिकोडे यांच्यासह अशोक देसाई, नगरसेवक अजित ठाणेकर, आशिष ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. एम.एस. कलशेट्टी यांची भेट घेऊन काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेवर चर्चा केली.

कोल्हापूरच्या दृष्टीने ही योजना महत्वाची आहे. या योजनेवर केंद्र, राज्य शासन आणि महापालिकेचे सुमारे ३२५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ही योजना अव्यवहार्य आहे. त्यामुळे या योजनेचे काम थांबवता येत नाही. भाजपाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर अंमलबजावणी केल्यास योजनेच्या खर्चात कपात करणे शक्य असल्याचे मत जिल्हाध्यक्ष चिकोडे यांनी व्यक्त केले.

अजित ठाणेकर, बाबा इंदुलकर, विजयसिंह खाडे-पाटील, किरण नकाते आदींनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. सुचवलेल्या उपायांकडे दुर्लक्ष केले. दिलेल्या पत्रांनाही उत्तरेही दिली नसल्याचे शिष्टमंडळाने आयु्क्तांच्या निदर्शनास आणून दिले. सल्लागार कंपनीने ठेकेदाराला दिलेली पत्रे सदस्यांना उपलब्ध करुन दिली नाहीत. जल अभियंता आणि ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. इंदुलकर यांनी योजनेचा खर्च ४३ कोटींनी कसा वाढला, अशी विचारणा केली. जॅकवेलच्या कामास अजून दोन वर्षे लागतील, असे नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांनी सांगितले. महापालिका सभेत योजनेसंबंधी श्वेत पत्रिका काढल्याचा आदेश होऊन देखील ती न काढल्याबद्दल खाडे यांनी नाराजी व्यक्त केली.

ठेकेदार आणि सल्लागार कंपनीकडे पुरेसे आणि सक्षम मनुष्यबळ आहे का, याची खात्री करावी. योजनेला काळम्मावाडी धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातूनच वीज पुरवठा देण्यासाठी प्रयत्न करावेत. अधिक क्षमतेचे पंप बसवावेत. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराची माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

शिष्ट मंडळाचे मुद्दे योग्य असून याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन आयु्क्त डॉ. कलशेट्टी यानी दिले.

यावेळी उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, मारुती भागोजी, किशोरी स्वामी, सुलभा मुजूमदार, प्रभावती इनामदार, नगरसेविका उमा इंगळे, गीता गुरव, उमेश निरंकारी, अऩिल काटकर आदी उपस्थित होते.

243 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा