Breaking News

 

 

लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – निमित्त ‘मल्टीस्टेट’चं…लक्ष्य विधानसभेचं..!

दोन दिवसांपूर्वी गोकुळचे संचालक आणि माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी ‘मल्टीस्टेट’चा मुद्दा पुन्हा चर्चेला आणला आहे. या मुद्यावरून माजी आमदार महादेवराव महाडिक आणि त्यांच्यामध्ये ‘कलगी तुरा’ रंगला आहे. यापूर्वीही ‘गोकुळ’च्या दुधाला लोकसभा निवडणुकीत चांगलीच उकळी आली होती. ते खूपच उतू गेलं अन् प्रस्थापितांना पराभवाचा ‘चटका’ बसला. लोकभावना लक्षात घेऊन विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना डोंगळे यांनी दूध फुंकूनच पिणे पसंत केले आहे.

लोकसभा निवडणुकीत ‘गोकुळ’च्या मल्टीस्टेटचा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधातील प्रचारासाठी हा मुद्दा खूपच महत्वपूर्ण ठरला होता. ‘गोकुळ’वरून महादेवराव महाडिक यांचे भाषण चांगलेच व्हायरल झाले होते. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत पहायलाही मिळाला. आता विधानसभेच्या तोंडावर अरुण डोंगळे यांनी अचानक पवित्र बदलला. आपण दूध उत्पादकांच्या हितासाठी प्रसंगी संचालकपदाचा राजीनामा देऊ, असा इशारा दिला.  त्यांनी हा इशारा तर दिलाच, पण त्याचबरोबर संघाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांवरही तोफ डागली. यामुळे आता  महादेवराव महाडिक आणि डोंगळे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

वास्तविक, यात नवीन काहीच नसले तरी लोकसभा निवडणुकीचे निकाल बघता डोंगळे यांनी आपली खदखद व्यक्त केली असल्याचे दिसून येत आहे. मल्टीस्टेटबाबत सत्ताधारी नेते कमी पडल्याचे डोंगळे यांचे वक्तव्य खरेच आहे. सर्वसाधारण सभेत झालेल्या वादंगावरून त्यांनी सत्ताधारी गटाला घरचा अहेरच दिला आहे. गोकुळ मल्टीस्टेट होणे चांगले की वाईट हे नंतर ठरवता येईल, पण सद्य:परिस्थितीत हा मुद्दा जिल्ह्याच्या राजकारणात महत्वपूर्ण ठरत आहे. तसेही वेळ काळ पाहून डोंगळे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपली भूमिका ज्या प्रकारे मांडली त्याच प्रकारे गोकुळच्या इतर नेत्यांनी जे विधानसभेसाठी इच्छुक आहेत, त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.

लोकसभेच्या निकालातून ‘गोकुळ’च्या नेत्यांनी बोध घेणे गरजेचे आहे. कारण विधानसभा निवडणुकीत पुन्हा हा मुद्दा उपस्थित होणार, हे स्पष्ट आहे. या मुद्यावर ठोस असे स्पष्टीकरण ‘गोकुळ’च्या ‘कारभारी’ नेत्यांना देता आले पाहिजे. नाहीतर एकदा दुधाने ‘तोंड’ भाजले आहे. आता तरी ते ‘फुंकून’ पिणेच योग्य ठरेल. जसे ‘डोंगळे’ यांनी केले आहे अगदी तसेच..!

ठसकेबाज

1,611 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा