Breaking News

 

 

पायल तडवी आत्महत्या : तिन्ही महिला डॉक्टरांना जामीन नाकारला..!

मुंबई (प्रतिनिधी) : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. यानंतर डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अश्रू अनावर झाले होते. या तिन्ही महिला डॉक्टरांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे.

डॉ. पायल तडवी हिचा डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खांडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहेर यांनी छळ केला असल्याचा निष्कर्ष राज्यस्तरीय चौकशी समितीने काढला असला तरी या तिन्ही डॉक्टरांकडून जातीय शेरेबाजी केल्याचे ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत, असे समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. हे प्रकरण हाताळण्यात नायर रुग्णालयाचा स्त्रीरोग विभाग अपयशी ठरल्याचा ठपकाही या अहवालात ठेवण्यात आला आहे.

डॉ. पायल यांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने गेल्या आठवडय़ात अहवाल राज्य सरकारकडे सादर केला होता. याची एक प्रत वैद्यकीय शिक्षण विभागालाही प्राप्त झाली आहे.

नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह डॉ. पायलच्या सहकाऱ्यांच्या नोंदविलेल्या जबाबामधून तिचा तिन्ही डॉक्टरांकडून छळ केला जात असल्याच्या आरोपावर या अहवालात शिक्कामोर्तब केले आहे. तिन्ही डॉक्टरांवर कोणती कारवाई करावी याबाबत अहवालात सूचित केलेले नाही. या समितीला कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. प्रकरणाचा मुळापासून तपास करण्यासाठी समितीची नियुक्ती केली होती. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून शिफारसी या अहवालात सूचित केल्या आहेत, असे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डॉ. पायलने तिच्या विभागाकडे तिघीकडून होणाऱ्या छळाची तक्रार केली होती. त्यानंतर तिची बदली दोन महिन्यांसाठी दुसऱ्या युनिटला केली गेली. मात्र पुन्हा तिला याच युनिटला पाठविण्यात आले. युनिटप्रमुखांसह विभागप्रमुखांना या प्रकरणाबाबत माहिती असूनही नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाने याची योग्य रीतीने दखल न घेतल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.

309 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा