Breaking News

 

 

कोल्हापुरात २८ पासून प्रथमच ‘मंडपम प्रदर्शन’ : सागर चव्हाण

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : कोल्हापूर जिल्हा मंडप लाईटिंग डेकोरेशन असोसिएशनच्या वतीने व ऑल महाराष्ट्र टेंट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या सहयोगाने ‘मंडपम’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील रेल्वे गुड्स यार्डसमोरील रामकृष्ण लॉन येथे २८ ते ३० जून या कालावधीत हे प्रदर्शन होणार असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष सागर प्रल्हाद चव्हाण यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की,  या प्रदर्शनात १०० स्टॉल आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील हजारो मंडप डेकोरेटर्स व्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यासाठी या प्रदर्शनाचा लाभ होईल. प्रदर्शनामध्ये सुपर स्ट्रक्चर मंडप आणि डेकोरेशन साहित्य, फायबर साहित्य, फुलांचे तयार डेकोरेशन, कापड, खुर्ची, कर्टन्स, टेबल कव्हर्स, कनात, गालीचे, कारपेट, लाईट डेकोरेशन, स्टेज सेट, चवरी मंडप आणि डेकोरेशन व्यवसायाशी संबंधित देशभरातील साहित्य उत्पादक, विक्रेते सहभागी होणार आहेत. मंडप डेकोरेशनसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी पाहण्याची व खरेदी करण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते २८ जून रोजी सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. आ. सतेज पाटील अध्यक्षस्थान भूषविणार असून संस्थापक-अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण उपस्थित राहणार आहेत. दुपारी ४ वाजता व्यावसायिक मार्गदर्शन, चर्चासत्राबरोबर ऑर्गनायझेशनची बैठक आयोजित केली आहे. यावेळी ऑल इंडिया टेंट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशनचे कर्तारसिंग कोचर व राज्याध्यक्ष दडू पुरोहित उपस्थित राहणार आहेत. रात्री ८ वाजता संगीतसंध्या होईल. २९ जूनला सायं. ४ वाजता जीएसटीविषयी चर्चासत्र होईल, तर समारोपाला (३० जून) सायंकाळी ७.३० वाजता फक्त निमंत्रितांसाठी महाराजा बॅन्क्वेट हॉल येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोल्हापूरबरोबरच सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील जवळपास तीन हजार मंडप व्यावसायिकांची उपस्थिती यावेळी राहील, असेही चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी प्रणय तेली (सिंधुदुर्ग), अमरिश सावंत (रत्नागिरी), मोहन करपे (सातारा), शिवकुमार पाटील (सोलापूर), अनिल काटे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

1,173 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा