गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याचं राजकारण तापलं आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह निकटवर्तींयावर ईडीने छापेमारी केल्याने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून ते भाजपला दोष देत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या आज (ता. १६) कोल्हापुरात दाखल झाले असून, या दौऱ्य़ादरम्यान सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह ठाकरे गटावर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी बंद पडलेल्या दोन कंपन्य़ांनी आमदार मुश्रीफांच्या खात्यात 49 कोटी का टाकले ? असा सवाल करत आरोपांचं सत्र सुरुच ठेवलं.

मिळालेल्या माहितीनुसार सोमय्या यांनी कोल्हापुरात येऊन थेट हसन मुश्रीफ यांच्यासह ठाकरे गटावर जोरदार टीका केली सोमय्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली व मुश्रीफ यांच्या घोटाळ्याकडं सर्वांचं लक्ष वेधलं. 49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ कुटुंबाच्या खात्यात का आले? याच उत्तर द्या. रजत कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अस्तित्वात नसताना हे पैसे आले. बंद पडलेल्या कंपन्यांमधून खात्यात पैसे कसे येतात हे कोल्हापूरकरांना कळू द्या. हे पैसे कसे आले हे कळलं तर कोल्हापूरकर आयुष्यभर नव्हे सात जन्म नमस्कार करतील, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला.

यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले की, मुश्रीफांनी आपल्या जावयाला दरवर्षी १५० कोटी मिळतील याची तजवीज केली होती. मुश्रीफांनी केवळ हे टेंडर रद्द केल्याचे न सांगता ते काढले कोणत्या उद्देशाने हे सर्वांना सांगावे ज्याच्य़ात सर्व स्पष्ट होईल असे ही ते म्हणाले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील मुंबई महानगरपालिकेत १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्य़ामुळे महाविकास आघाडी याला कसे उत्तर देते हे महत्त्वाचं ठरणार आहे.