मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री उर्फी जावेदला सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली होती. त्यानुसार उर्फी जावेद आज अंबोली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
गेल्या काही दिवसांत भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे म्हटले होते. असला नंगानाच खपवून घेणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी उर्फी जावेदला दिला होता. त्यानंतर उर्फीनेही आपला नंगानाच असाच सुरु राहणार म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिले होते. चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात मुंबई पोलिसांची भेट घेत तक्रार केली होती.
आता सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलिस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. पोलिसांनी उर्फीला आज हजर होण्याची नोटीस जारी केली होती. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. सहायक पोलिस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
उर्फीच्या विरोधात मुंबईमधील काही महिला सामाजिक संस्था देखील आक्रमक झाल्या आहेत. उर्फी ही सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करते. त्यामुळे समाजातील तरुण मुले-मुली यांच्यावर तिचा प्रभाव पडत आहे. त्यामुळे तिच्या विरोधात सक्त कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली होती. उर्फी जावेदने शुक्रवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची देखील भेट घेतली होती.