कुरुंदवाड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत फेडरेशनच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे सुपुत्र अजय पाटील-यड्रावकर यांची बिनविरोध निवड झाली असून, या निवडीमुळे राज्य पातळीवर काम करण्याची संधी तरुण आणि उमद्या नेतृत्वाला मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्यातील जवळपास १४५ सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहतींचे नेतृत्व करणारे हे फेडरेशन असून, सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहतींच्या समोरील प्रश्नांची सोडवणूक या फेडरेशनच्या माध्यमातून होत असते. महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशनची स्थापना ५२ वर्षांपूर्वी झाली असून, महाराष्ट्र राज्य हे या संस्थेचे कार्यक्षेत्र आहे.

फेडरेशनच्या माध्यमातून सहकारी औद्योगिक वसाहतींना शासकीय जमिनी मिळवून देणे, वसाहती समोरच्या अडचणी शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी फेडरेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणे ही कामे केली जातात. राज्यातील या सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहतींमध्ये जवळपास दोन लाख लोक काम करीत असून, कोट्यवधी रुपयाची आर्थिक उलाढाल यामधून होत असते.

राज्याच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम सहकारी तत्त्वावरील या औद्योगिक वसाहतीनी केले आहे. औद्योगिक वसाहतींचे नेतृत्व करणाऱ्या या फेडरेशनच्या १५ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. यापूर्वी या फेडरेशनवर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी चेअरमन व संचालक म्हणून काम पाहिले आहे.