कुरुंदवाड (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत शिरोळ तालुक्यातील अतिशय वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या दोन रस्त्यांसाठी जवळपास दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या रस्त्यांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे, अशी माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.

तालुक्यातील राज्य मार्ग क्रमांक १५३ शिरोळ ते कुटवाड पर्यंतचा जवळपास ६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ५ कोटी ३१ लाख ३७ हजार रुपये, तर तालुक्यातील प्रजिमा २३ औरवाड बुबनाळ ते आलासपर्यंत जाणाऱ्या ६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ४ कोटी ४८ लाख २९ हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. आलास पासून पुढे जुगुळ राज्य हद्दीपर्यंतच्या रस्त्यासाठी बजेटमधून ६७ लाखाचा निधी मंजूर केला असून, या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

औरवाड ते बुबनाळ आलास मार्गे जुगुळ राज्य मार्गापर्यंत पुढे महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य वाहतुकीसाठी असणारा हा रस्ता लवकरच मजबूत होणार असून, हा रस्ता व्हावा, अशी अनेक वर्षाची जनतेची असणारी मागणी या कामामुळे पूर्ण होणार आहे. असेही आ. यड्रावकर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत होणारे हे रस्ते मजबूत होतील आणि या रस्त्याच्या ठेकेदारावर रस्ता केल्यानंतर पुढे पाच वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे या रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.