नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्यांचा नवीन पक्षप्रमुख निवडायचा आहे. त्यासाठी संघटनात्मक निवडणूक घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून मुदत २३ जानेवारी २०२३ रोजी संपत आहे. ठाकरे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या काही सदस्यांची निवड करायची आहे. संघटनात्मक निवडणुका घेऊन ही निवड केली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांची मुदत संपण्याआधी संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी दिली नाही तर उद्धव ठाकरे यांना पुढील आदेश येईपर्यंत पक्षप्रमुख राहू द्यावे, अशीही मागणी निडवणूक आयोगाकडे करण्यात आली आहे, असेही खासदार देसाई यांनी सांगितले.

२०१९ ची निवडणूक लढवताना उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून चालले. २०२२ मध्ये अचानक असा काय साक्षात्कार झाला आहे की त्यांचे नेतृत्त्व नाकारण्यात आले. त्यावेळी कार्यकारिणीच्या बैठकीला पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे हजर नव्हते, असे शिंदे गटाने म्हटले आहे. म्हणजे एकीकडे सर्व मान्य करायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा असे सर्व सुरु आहे. शिंदे गटाला स्वतःचा विचार नाही. भलतेच काही तरी बोलायचे. विचार करायचा नाही, अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे, असेही खासदार देसाई यांनी सांगितले.