कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील किसरूळ पैकी मुगडेवाडी येथे जमिनीच्या मालकी हक्कावरून व शेड मारल्याच्या कारणावरून जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी एकावर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

किसरूळ पैकी मुगडेवाडी येथे दिनकर माळवी व शामराव पाटील (रा. तेलवे ता. पन्हाळा) यांच्यात जमिनीच्या मालकी हक्कावरून कळेे-खिरवडे न्यायालयात दावा सुरू आहे. दि.३ रोजी या जागेवर शेड मारल्याच्या कारणावरून शामराव पाटील यांनी दिनकर माळवी यांची शर्टची कॉलर पकडून त्यांच्या पत्नीसह त्यांना अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ व दमदाटी करत धक्काबुक्की केल्याप्रकरणी दिनकर श्रीपती माळवी (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार शामराव आबा पाटील (वय ७०) यांच्यावर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र साळुंखे करत आहेत.