मुंबई (प्रतिनिधी) : मागच्या दोन दिवसांपासून थंडी वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील जवळपास १९ जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता  हवामान विभागाने वर्तवली आहे.

तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरी होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. पुणे, नगर जिल्ह्यांतील काही भागात थंडीची दाट लाट येण्याची शक्यता आहे. याचबरोबर औरंगाबाद, जालना, बीडसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात थंडीची लाट शक्य आहे. तसेच कोल्हापूर, सातारा आणि मुंबईमध्ये पारा १० ते १५ अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

भारताच्या उत्तरेत म्हणजे काश्मीर, लडाख, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच राजस्थानात पश्चिमी चक्रवात झाल्यामुळे थंडी कमी-अधिक होत आहे. मागच्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घसरण झाल्याने आणि दाट धुके पसरल्याने कडाक्याची थंडी महाराष्ट्रातील काही भागात पडत आहे. मागच्या २४ तासांत थंड वाऱ्याचा वेग कमी होता, तर दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत होता.  रात्री तापमान कमालीचे घसरले होते.  पुढचे दोन दिवस हेच चित्र राहण्याची शक्यता आहे.