पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई; अवघ्या दोन तासात चोरांना केले जेरबंद

पंढरपूर प्रतिनिधी/

विठ्ठल मंदिराचा पत्ता विचारणाऱ्या भाविकाला दोघांनी मोटारसायकलवर बसवून निर्जन ठिकाणी नेऊन जीवे मारण्याची धमकी देत लुटल्याची घटना घडली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना दोन तासांमध्ये पकडल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, विनायक बाबूराव वाडकर (वय ३०, रा. वनाळी, ता. कागल, जि. कोल्हापूर) हे शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पंढरपूर येथे देवदर्शनाकरिता खासगी वाहनाने आले होते. ते देवदर्शन करण्याकरिता पहाटे चारच्या सुमारास पायी मंदिराकडे जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आले. तेथे दोन अनोळखी इसम त्यांच्याकडे आले तेव्हा वाडकर यांनी त्यांना विठ्ठल मंदिर येथून जवळ आहे का? असे विचारताच ते म्हणाले की,आम्ही मंदिराकडे चाललो आहे, तुम्हाला सोडतो, असे खोटे सांगत वाडकर यांना त्यांच्या मोटारसायकलवर मध्यभागी बसवून पुढे नेले नंतर तेथून गजानन महाराज मठाजवळून तसेच एका तळ्याजवळ निर्जन ठिकाणी घेऊन गेले. तेथे त्यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन वाडकर यांच्या खिशातील पाकीट बळजबरीने काढून घेतले. पाकिटात ३० हजार रुपये व आधार कार्ड होते. ते दोघेजण पाकीट घेऊन फिर्यादी वाडकर यांना तेथेच सोडून आपल्या मोटारसायकलवरुन निघून गेले. याबाबत शहर पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारचे गुन्हे यापूर्वी केलेल्या आरोपींची गोपनीय माहितीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर पोलीस हवालदार सूरज हेंबाडे यांनी दोन तासांमध्ये अतिष उर्फ महादेव सगर, किरण वाडेकर (रा. पंढरपूर) या दोन्ही आरोपींना अटक केली. तसेच चोरीला गेलेले तीस हजार रुपये, पाकीट आणि आधार कार्डही चोरांकडून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपींना चार- दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.