मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉक्टरांनी पुढील ८ दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांच्यावर डोळ्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मागील डिसेंबर महिन्यात शरद पवारांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर मंगळवारी सकाळी १० वाजता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होणार असून, संसर्ग टाळण्यासाठी शरद पवारांना १८ जानेवारीपर्यंत सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे शरद पवार १८ जानेवारीपर्यंत कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावणार नाहीत.

उजव्या डोळ्यातील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार यांना लगेचच घरी सोडण्यात येणार आहे. पुढील ८ दिवस ते त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी मुक्कामाला असणार आहेत. १८ जानेवारीपर्यंत शरद पवारांना घराबाहेर पडू नका असे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे घरातूनच ते पक्षाच्या कार्यक्रमाला अथवा बैठकीला हजर राहतील, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.