मुंबई : ‘बिग बॉस’ मराठीचा महाअंतिम सोहळा अखेर ८ जानेवारी पार पडला. यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

यावेळी बिग बॉस मराठीच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर ठरला. तर अपूर्वा नेमळेकरने दुसरे स्थान पटकावले. बिग बॉस मराठीचा १०० दिवसांचा प्रवास काल संपला. या कार्यक्रमाच्या या पर्वाला देखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले.

अपूर्वा नेमळेकरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अक्षय केळकरला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली.

अक्षय केळकर हा बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर सातत्याने चर्चेत होता. हा खेळाडू वृत्ती, टास्क मधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे त्याने महाराष्ट्राच्या घराघरात एक स्थान निर्माण केले. बिग बॉसच्या घरात गेलेल्या अक्षय केळकरने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गुपित उघड केली. बिग बॉसच्या घरात रंगलेल्या एका टास्कदरम्यान अक्षय केळकरने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले होते. त्यावेळी त्याने “माझ्या आयुष्यातले पहिले प्रेम आईने जुळवून दिल होते, अशी कबुलीही दिली होती.