मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने मुलुंड येथे निधन झाले. डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही काम केले तसेच ते वृत्तनिवेदक, लेखक, अभिनेते देखील होते. त्यांनी आत्तापर्यंत जवळपास १८ पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले आहे. याव्यतिरिक्त ते मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार म्हणूनही ते ओळखले जायचे.

डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली होती. त्यानंतर त्यांची मीडियासंबंधी कारकीर्द दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून सुरू झाली. दिल्ली आकाशवाणीवरुन पहिल्या मराठी बातम्या वाचणारे ते निवेदक ठरले. तसेच ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक देखील होते शिवाय ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकही होते. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख होते. ‘सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन’चे ते संस्थापक होते.

विश्वास मेहेंदळे हे मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार आहेत. त्यांचा ‘मला भेटलेली माणसे’ हा एकपात्री कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला होता. या शिवाय ‘अग्निदिव्य’, ‘एकच प्याला’, ‘एक तमाशा अच्छा खासा’, ‘खून पहावा करून’, ‘जर असं घडलं तर’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘पंडित आता तरी शहाणे व्हा’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये मेहेंदळे यांनी भूमिका साकारल्या होत्या.