गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर येथील शाहू मार्केट यार्डात गूळ सौद्याचा पेच निर्माण झाला होता, तो आता सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून माथाडी कामगार ५० टक्के मजुरी वाढ देण्याची मागणी करत आहेत. यासाठी त्यांनी काम थांबले आहे. यावर पर्याय म्हणून शाहूपुरी व्यापारी असोसिएशनने निर्णय घेतला आहे. त्यानुसार बाहेरुन माथाडी कामगार आणले जाणार आहेत.

शाहूपुरी व्यापारी असोसिएशनची नुकतीच बैठक पार पडली असून, या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आज शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ पासून गूळ सौदे सुरू झाले आहेत. माथाडी कामगारांच्या निर्णयावर पर्याय म्हणून व्यापारी, अडते, शेतकरी यांनी एकत्र बैठक घेतली. यात अन्य बाजार पेठेतील माथाडी आणून गूळ रवे उतरणे, भरणे, वजन करणे अशी कामे करतील, त्यासाठी बाजार समितीनेही सहकार्य करावे, अशा मागणीचे पत्र व्यापाऱ्यांनी बाजार समितीला आज दिले.

गूळ उतरणे भरण्याचे काम ठप्प

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आपला गूळ बाजारात आणत आहेत, तो गूळ उतरणे भरण्याचे काम ठप्प झाले होते. परिणामी शेतकऱ्यांचा गूळ पडून होता. व्यापाऱ्यांनी सौद्यात खरेदी केलेला केलेला गूळ पुढील बाजार पेठेत पाठवण्याचे कामही ठप्प झाले होते. यावर आता मार्ग काढण्यात आला आहे.