कोल्हापूर : कुंभार समाजाचा संपूर्ण व्यवसाय, माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर अवलंबून आहे. मात्र केंद्रीय प्रदूषण मंडळाने मूर्ती विसर्जनावर नवे नियम लागु करत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधामुळे कुंभार समाजाचे नुकसान होत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या शिष्टमंडळाने आज शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली.

मुंबई उच्च न्यायालय नागपूर बेंच यांच्या जनहित याचिकेमध्ये महाराष्ट्र शासनाने सादर करावयाच्या अहवालामध्ये पीओपीवर संशोधन असणाऱ्या शास्त्रज्ञांची व मूर्तिकारांची मते विचारात घ्यावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेवून केली.

यावेळी मूर्ती घडविणाऱ्या कुंभार समाजावर कोणताही अन्याय होवू देणार नाही. येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेवून प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी हटविण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करू, अशी ग्वाही यावेळी क्षीरसागर यांनी दिली.

पुढे बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, पीओपी संदर्भात यापूर्वी तत्कालीन नगरविकास मंत्री आणि सद्याचे मुख्यमंत्र्याच्यासमवेत बैठक घेण्यात आली होती. यानंतर कुंभार समाजावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. या संदर्भात शिवसेना नेहमीच कुंभार बांधवांच्या पाठीशी ठाम उभी राहिली असून, हा प्रश्न कायमचा सुटण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील असणार आहे. अशी भूमिका क्षीरसागर यांनी स्पष्ट केली. यावेळी महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेचे सचिव प्रवीण बावधनकर आदी मान्यवर उपस्थित होते.