दिल्ली (वृत्तसंस्थ) : जगभरात पुन्हा वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची पुन्हा कोरोन चाचाणी करण्यास सुरूवात केली आहे. या तपासणीदरम्यान परदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये ओमिक्रॉनचे ११ सब-व्हेरिएंट आढळूल आले आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

२४ जानेवारी ते ४ जानेवारी दरम्यान एकूण १९,२२७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १२४ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर या सर्वांना सुरक्षेच्या कारणास्तव वेगळे ठेवण्यात आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पॉझिटिव्ह आढळून आलेल्या संक्रमित रूग्णांमध्ये ओमिक्रॉनच्या सब-व्हेरिएंटच्या ११  प्रकारांची पुष्टी करण्यात आली आहे.

ज्यात XBB व्हेरिएंटचादेखील समावेश आहे. सध्या या व्हेरिएंटने जगभरात थैमान घातले आहे. १२४  पॉझिटिव्ह नमुन्यांपैकी ४० चे जीनोम सिक्वेन्सिंगचा रिझल्ट प्राप्त झाले असून, ज्यामध्ये XBB.1 सह XBB व्हेरिएंट १४  सॅम्पल्समध्ये आढळून आले आहे.

तर, एका सॅम्पलमध्ये BF ७.४.१ आढळून आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याची लागण झालेल्या रूग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे दिसून आलेली नाही. भारतीय लसीचा या व्हेरिएंटवर लक्षणीय परिणाम दिसून आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.