Breaking News

 

 

धोकादायक इमारती पोलिसांनी रिकाम्या केल्यावरच कारवाई : स्थायी सभेत प्रशासनाची भूमिका

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शहरातील धोकादायक इमारती रिकाम्या करुन देण्याची जबाबदारी पोलीसांची आहे. पोलीसांना लेखी कळवले आहे. त्यानंतर महापालिकेतर्फे या इमारती पाडण्याची कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने आज (शुक्रवार) स्थायी सभेत स्पष्ट केले.

धोकादायक इमारती संबंधी केवळ नोटीसा काढून न थांबता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राजाराम गायकवाड यांनी केली. त्याला उत्तर देताना प्रशासनाने पोलीसांकडे बोट दाखवून बाजू काढली.  

शहरातील मोठ्या झाडांच्या फांद्या घरावर, विजेच्या तारेवर येत आहेत. याशिवाय फांदी पडून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फांद्या का कापल्या जात नाहीत, असा प्रश्न संदीप कवाळे यांनी उपस्थित केला. हे काम ठेकेदाराकडून केले जात आहे. समन्वय ठेऊन काम पूर्ण केले जाईल, असे प्रशासनाने सांगितले.

रोजंदारी वाहनचालकांच्या पगारवाढीचा कार्यालयीन प्रस्ताव तयार असून पुढील सभेत तो सादर केला जाईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. यासंबंधीचा प्रश्न सौ. सविता भालकर यांनी उपस्थित केला.

लोकसभेची आता आचारसंहिता संपल्याने पदपथावरील अतिक्रमणे काढा, अशी मागणी सौ. प्रतिक्षा पाटील यांनी केली. त्यावर अतिक्रमण हटाव मोहिम सुरु आहे. अतिक्रमण केले असेल तर ते हटवले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

टाकाळा खण स्वच्छते संबंधी सौ. सविता भालकर यांनी प्रश्न उपस्थित केला. चारही विभागीय कार्यालयाकडून कर्मचारी एकत्रीत घेऊन काम पूर्ण केले जाईल, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.  

सभापती शारंगधर देशमुख यांनी अमृत योजनेतील ड्रेनेज व पाण्याचे पाईप लाईनची काम होत नाहीत. ठेकेदार काम करत नाहीत. पावसाळा सुरु असलेने अमृत योजनेमधून करण्यात येत असलेल्या कामामुळे उकरलेले रस्ते लवकरात लवकर डांबरीकरण करुन घ्या, अशी सुचना केली. यासंबंधी सोमवारी (दि. १७) ठेकेदार, सल्लागार आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कर्मचा-यांचे अद्याप पगार झाले नसल्याकडे माधुरी लाड यांनी लक्ष वेधले. शामसोसायटी नाला साफ करुनही पाणी रस्त्यावर का साचते, याची पाहणी केली जाईल. असे प्रशासनाने स्पष्ट केले.

बागेत वॉचमन व कामगार किती आहेत. मंगळवार (दि.१८)  रोजी अकरा वाजता सर्वांना एकत्रीत बोलवा, अशी मागणी माधुरी लाड, सौ.पुजा नाईकनवरे यांनी केली. ती मान्य करत त्या सर्वांना मंगळवारी हजर ठेऊ, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

279 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग