Breaking News

 

 

थेट पाईपलाईनसाठी पुढील तीस दिवस महत्त्वाचे, अन्यथा…

कोल्हापूर (सरदार करले) : कोल्हापूरकरांना काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होण्यासाठी पुढील तीस दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या तीस दिवसात इन्टेक वेल आणि जॅकवेलचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा थेट पाईपलाईनसाठी आणखी काही महिने प्रतीक्षाच वाट्याला येण्याची शक्यता आहे. महापौर, आयुक्त यांच्यासह प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी आज (शुक्रवार) काळम्मावाडी थेट पाईपलाईन प्रकल्पाच्या कामांची पाहणी केली.

थेट पाईपलाईनच्या कामांची पाहणी करण्यासाठी आज पुईखडीपासून सुरुवात झाली. येथे उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले असून या केंद्राची सध्या चाचणी सुरु आहे. ३१ जुलैपर्यंत केंद्र कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सुचना आयुक्त एम.एस. कलशेट्टी यांनी दिल्या. याशिवाय या परिसरात वृक्ष लागवड करण्यास सांगण्यात आले आहे.

काळम्मावाडी धरणातील थेट पाईपलाईनसाठीच्या इन्टेक वेल आणि जॅकवेलच्या कामांची पाहणी केली. इन्टेक वेलमध्ये सहा रोझपीस बसवण्यात आले असून पाच क्युबीक मीटरचे काँक्रीट टाकण्यात आले आहे. उर्वरीत काम पुढील तीन दिवसात पूर्ण होईल. दोन इन्टेक वेल असून जॅकवेलपर्यंतची पाईपलाईन पावसाळ्यानंतर टाकण्यात येणार आहे. दोन जॅकवेल असणार आहेत. त्यापैकी एका जॅकवेलचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या जॅकवेलचे काम सत्तर टक्के झाले आहे. उर्वरीत तीस टक्के काम पाचदिवसात पुर्ण होईल. कामात अडथळा होऊ नये म्हणून कॉपर डॅमची उंची दीड मीटरने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षी काम गतीने होऊ शकेल.

गेल्या चार दिवसात वारा आणि पावसामुळे कामाची गती मंदावली आहे. पंधरा लाख लिटर क्षमतेच्या आणि वीस मीटर उंचीच्या पाण्याच्या टाकीचे बारा मीटरपर्यंत काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी १२५ कर्मचारी आणि २५ अधिकारी कार्यरत आहेत. थेट पाईपलाईन योजनेत काही अडथळे आहेत. त्यामध्ये वनविभागाच्या क्षेत्रातील सातशे मीटरचा परवाना मंजुरीच्या टप्प्यावर आहे. नरतवडे येथील वीज मंडळाचे खांब अन्यत्र हलवण्यासाठी आठ लाख रुपये भरले आहेत.

राजापूर येथील ग्रामस्थांचा विरोध मावळला आहे. कपिलेश्वर आणि सोळांकूर येथील ग्रामस्थांचा विरोध कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ५२.९५ किलोमीटर इतक्या अंतराची थेट पाईपलाईन टाकली जाणार आहे. त्यापैकी ४६ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. काम तातडीने होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी दिल्या.

यावेळी महापौर सौ. सरिता मोरे, नंदकुमार मोरे, शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, रामचंद्र गायकवाड, विजय मोहिते, युनिटी कन्सल्टंटचे महेश पाठक, राजेंद्र हसबे, प्रकल्प अधिकारी राजेंद्र माळी आदी उपस्थित होते.

885 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा