दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील इस्पुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मद्यपींचा अड्डा बनले आहे. येथील रक्त-लघवी तपासणी केंद्राच्या दारातचं गावातील मद्यपींनी अड्डा केला आहे.

या दवाखान्याला चारही बाजूंनी कंपाऊंड बांधले आहे. तर गावातील मद्यपी आणि काही माथेफिरूंनी या आवारात रात्रीच्या वेळेस जाण्यासाठी हे कंपाऊंड जागोजागी पाडले आहे. तसेच गावातील तरुणांनी रात्रीच्या वेळेस वाढदिवस साजरे करत मद्यप्राशन करून दंगा करण्यासारखे प्रकार वारंवार घडत आहेत. हे फक्त तपासणी केंद्राच्या दारातच नव्हे तर याच्या बाजूला असलेल्या अंगणवाडीच्या दारातही असेच प्रकार वारंवार घडत आहेत.

काही महिन्यांपूर्वी दवाखान्याच्या आवारातील पाण्याच्या विद्युत मोटारीही चोरीला गेल्या होत्या. त्यावेळी आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीला  दवाखाना परिसरात होणारा अनावश्यक वावर, खासगी वाहनांचे पार्किंग तसेच दवाखान्याचे कंपाऊंड जागोजागी पाडल्याचे लेखी पत्र दिले होते.  मात्र, ग्रामपंचायतीकडून याबाबत संबंधात कोणतीही ठोस पाऊले  उचलली नाहीत.

या संदर्भात ‘लाईव्ह मराठी’ने ग्रामपंचायतशी संपर्क साधला असता, त्यांनी दवाखान्याच्या आवारात होणारे अनावश्यक पार्किंगसाठीची जबाबदारी ही  कर्मचाऱ्यांची असल्याचे सांगितले. तसेच असे प्रकार जर दवाखान्याच्या आवारात घडत असतील तर रात्रीच्या वेळेस काम करणारे कर्मचारी काय करतात ? असा सवालही त्यांनी केला.

एकीकडे तरुणाईने व्यसनापासून दूर राहावे, यासाठी आरोग्य विभागाकडून लोकांच्यामध्ये जागरूकता करण्याचे काम सुरु आहे. त्याच आरोग्य विभागाच्या दारात असा प्रकार होणे हे अतिशय दुर्देवी बाब असल्याची चर्चा सुरु आहे. याच्यावर ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग काय निर्णय घेतात यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.