टोप (प्रतिनिधी) : दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीपात्रातील मासे मृत झाले असून करवीर तालुक्यातील शिये पुलाजवळ आज (सोमवार) मृत माशांचा खच पहायला मिळाला. नदीचे दूषित पाणी आणि मृत मासे यामुळे पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. दूषित पाण्यामुळे पंचगंगाकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असल्याचे बोलले जात आहे.

पंचगंगा नदीतील पाणी दूषित झाल्यामुळे मासे मृत्युमुखी पडले आहेत.  तर नदीच्या पाण्यावर मासे तरंगत असल्याचे चित्र दिसून आले. पाण्याचा रंग बदलून तो हिरवट दिसत होता. तसेच पाण्याला दुर्गंधीही पसरली होती. हा सर्व प्रकार शिरोली एमआयडीसी परिसरात राहणारे अनेक परप्रांतीय कामगारांना कळाल्यानंतर आज सुट्टीच्या दिवशी नदीकाठावरती मासे पकडण्यासाठी गर्दी करत होते.

सायंकाळपर्यंत मासे भरुन पोतीच्या-पोती घेऊन जाताना अनेकजण पहायला मिळाले. मात्र, हे दूषित पाण्यामुळे मृत झालेले मासे खाणे योग्य आहेत का, याची तपासणी न करताच होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार अशी चर्चा रंगली आहे.