कोल्हापूर ( प्रतिनिधी) गेल्या अनेक महिन्यांपासून कागल तालुक्यातील खडकेवाडा व बेळुंकी येथील गावठाणातील सुपुर्द केलेल्या जमीनींची मालकी पत्रे सुपुर्द करण्याबाबतचा प्रश्न प्रलंबितच आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आज आमदार आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित बैठक पार पडली असून यावेळी आमदार मुश्रीफ यांना खडकेवाडा व बेळुंकीच्या भूखंडधारकांची मालकी नियमित करण्याच्या सुचना देत हा प्रश्न मार्गी लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कागल तालुक्यातील खडकेवाडा व बेळुंकी येथील गावठाणातील भूखंड धारकांची प्रलंबित मालकी हक्काची मागणी नियमित करण्यासाठी आज बैठक पार पडली, यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी खडकेवाडा व बेळुंकीच्या भूखंडधारकांची मालकी नियमित करा अशा सुचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. ही बैठक कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या दालनात पार पडली.

याबाबत अधिक माहिती अशी, गावातील घरे नसलेल्या २५ जणांना गावठाणातील भूखंडांची ताबापट्टी मिळून, त्यावरती ग्रामस्थांनी घरे बांधलेली आहेत. परंतु; त्यांना अद्यापही मालकीपत्रे मिळालेली नाहीत. हा प्रश्न तातडीने निकालात काढण्याच्या सूचना आमदार श्री. मुश्रीफ यांनी दिल्या. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील ३२ भूखंडापैकी १४ ग्रामस्थांनी घरे बांधलेली आहेत. त्यांनाही अद्याप कब्जेपट्टी मिळालेली नाही. आठ भूखंडधारकांनी शर्तभंग केलेली आहे. तसेच, दहा भूखंड मोकळे आहेत. या सर्वांना सनदशीर मार्गाने वहिवाटीनुसार त्यांची मालकी हक्कपत्रे देण्याच्या सूचना आमदार श्री. मुश्रीफ यांनी केल्या.

या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती अश्विनी जिरंगे, कागलच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, सरपंच भाऊसाहेब पाटील, अशोक पाटील, संतोष पाटील, हरी कुंभार, प्रल्हाद पाटील, युवराज जाधव, सतीश कुंभार आदी प्रमुख उपस्थित होते.