दिल्ली (वृत्तसंस्थ) : जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढावले आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने थैमान घातले असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जपानमध्ये कोरोनामुळे मृतांच्या वाढत्या आकड्याने चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका वाढला आहे. पुढच्या ४० दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे ४० दिवस खूप महत्वाचे आहेत.

जानेवारीत कोरोनाची प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. कोरोनाची चौथी लाट आली तरी मृतांची संख्या वाढणार नाही, किंवा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. पूर्व आशियामध्ये कोरोनाची लाट आल्यानंतर ३० ते ३५ दिवसांनी भारतात कोरोनाची नवीन लाट येते, भारतात याआधी आलेल्या कोरोना लाटेनुसार अहवालानुसार ही बाब समोर आली आहे. आता कोरोनाच्या नव्या लाटेने पूर्व आशियाई देशांमध्ये जोर पकडला आहे. चीनपासून, दक्षिण कोरिया, सिंगापूर, जपान या देशांत नवीन कोरोना रुग्ण वेगाने वाढत आहेत. या आधारावर, जानेवारीच्या अखेरीस भारतात नवीन रुग्णणांमध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.