कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यात लक्ष्यवेधी ठरलेल्या सावर्डे तर्फ असंडोली ग्रामपंचायतीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे संभाजी पांडूरंग कापडे यांच्या जोतिर्लिंग ग्रामविकास आघाडीने सरपंचपदासह तीन सदस्य जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. सावर्डे ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण खुला प्रवर्ग आरक्षण पडल्यामुळे निवडणुकीसाठी प्रभागातील ९ सदस्यासह थेट सरपंचपदासाठी तिरंगी लढत झाली होती. 

कुंभी साखर कारखानाचे संचालक आबा रामा पाटील, रंगराव पाटील, अजित बच्चे, प्रकाश पाटील(माजी.आ.चंद्रदीप नरके गट) यांच्या नेतृत्वाखालील हनुमान आघाडीतून सरपंचपदासाठी कृष्णात सिताराम पाटील रिंगणात होते. पंचायत समिती माजी सदस्य विलास गणपती पाटील (आ.पी.एन.पाटील गट) यांच्या नेतृत्वाखालील स्वयंभूराज जोतिर्लिंग आघाडीतून विनोद विलास पाटील रिंगणात होते. तर सरदार पाटील, चेतन पाटील, विश्वजीत बच्चे, (आ.विनरावजी कोरे गट) यांच्या नेतृत्वाखालील जोतिर्लिंग आघाडीतून माजी उपसरपंच संभाजी पांडूरंग कापडे रिंगणात होते.

जोतिर्लिंग आघाडीची भक्कम बांधणी झाल्यामुळे जनमताचा सकारात्म कौल सरपंचपदासाठी संभाजी कापडे यांना मिळाला. चुरशीच्या तिरंगी लढतीत संभाजी कापडे यांनी ४५३ मते घेऊन सरपंचपदासह तीन सदस्यांसह बाजी मारली. कुंभीचे संचालक आबा पाटील यांचे तीन उमेदवार तर पं.स.माजी.सदस्य विलास पाटील यांच्या गटाचे तीन उमेदवार विजयी झाले. सरपंचपद वगळता तीनही प्रभागांमध्ये प्रत्येक गटाचे तीन उमेदवार निवडून आल्याने उपसरपंचपदासाठी कोणते दोन गट एकत्र येणार व उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.