Breaking News

 

 

कोल्हापुरी ठसका : कागलच्या राजकारणाचं त्रांगडं !

पावसाळा उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. त्यामुळे ग्रामीण भागात अंदाज घेत पेरणीची बळीराजाची लगबग सुरु आहे. राजकीय पुढाऱ्यांचीही सध्या तशीच लगबग सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची बीजपेरणी राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते करु लागले आहेत. राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला जातोय. जिल्ह्यातील दहाही मतदारसंघात राजकीय हालचाली सुरू आहेत.

कागल म्हणजे राजकारणाचं स्वायत्त विद्यापीठ. घराघरात, गटागटात राजकीय बाळकडू मिळालेल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्याही तितकीच मोठी आहे. राजकारणातील ‘बिलंदर आणि धुरंधर’ याच मातीत अधिक आहेत. माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ, माजी आ. संजय घाटगे आणि शाहू उद्योग समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्यासारख्या मुरब्बी नेत्यांचे पुढील ‘लक्ष्य’ विधानसभा आहे, हे जगजाहीर आहे. लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल काहीही लागले असले, तरी विधानसभा निवडणुकीत काय होईल, हे आत्ताच सांगणे महाकठीण आहे. मतदारांच्या मनात काय चाललंय, त्यांचं काय ठरलंय यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.

माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ यांनी मागील पंधरा वर्षांमध्ये कागल विधानसभा मतदारसंघात चांगलेच बस्तान बसवले आहे. त्यांच्या कामाचा झपाटा मोठा आहे. तळागाळातील मतदारांशी त्यांची नाळ चांगलीच जुळली आहे. शासनाची कोणतीही योजना असो, त्याचे सर्वाधिक लाभार्थी सापडणार ते कागल मतदारसंघातच. त्यासाठी आ. मुश्रीफ यांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न कारणीभूत आहेत.

शाहू उद्योग समूहाच्या माध्यमातून समरजितसिंह घाटगे यांचीही मतदारांशी चांगलीच नाळ जुळली आहे. भाजपाने त्यांना ‘म्हाडा’चे अध्यक्षपद देऊन त्यांच्या ताकदीत भरच टाकली आहे. युतीधर्म पाळत त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारामागे ताकद लावली. त्याची फलनिष्पत्ती समोर आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांचा गटही मोठा आहे. त्यांच्या पाठीशी वैयक्तिक गटाची आणि शिवसेनेची ताकद असणार आहे. गतवेळच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, त्यांना मिळालेली मते राज्यात अन्यत्र विजयी झालेल्या आमदारांपेक्षा जास्त आहेत. १ लाख १७ हजार मते मिळवणारे ते प्रमुख पराभूत उमेदवार ठरले आहेत. शिवसेनेची ताकद लक्षात घेता कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे कागल विधानसभेची जागा सोडणार नाहीत, त्यामुळे उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा विश्वास त्यांना आहे.

कागल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्वच नेत्यांच्या पाठीशी साखर कारखान्यांची ताकद आहे. मुश्रीफ यांचा संताजी घोरपडे, समरजितसिंह घाटगे यांचा शाहू कारखाना कार्यरत आहे. संजय घाटगे यांच्या अन्नपूर्ण साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरु होईल.

कागलची जागा भाजप-शिवसेना युतीपैकी कुणाच्या वाट्याला जाणार हे पाहावे लागणार आहे. मात्र यातूनच कागलच्या राजकारणाचं त्रांगडंं होण्याची शक्यता अधिक आहे. काहीही असले, तरी मतदारांच्या मनात काय आहे, त्यांनी काय ‘ठरवलंय’ हेच महत्त्वाचं ठरणार आहे.

-ठसकेबाज

2,592 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा